सर्व भक्तांच्या विनंतीवरून सामुदायिक सर्व वरांचे उद्यापन (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार उजवणे). सर्व भक्तांना कळविणेत येते कि, सर्व वारांचे दि. २८/११/२०१६ रोजी उद्यापन करण्यात येणार आहे. तरी ज्या भक्तांना आपले वार उजविण्याचे आहे. त्यांनी मंदिराचे पुजारी यांचेकडे दक्षिणा देवून रीतसर पावती घ्यावी. व्यक्तीशा दक्षिणा ५२५/- रु. मर्यादित व्यक्तींना घेतले जाणार आहे. तरी आपली नावे लवकर नोंद करावीत. संपर्क : पुजारी श्री. अशोक भोरे मो. ९९७५४४१५१९.
रावणेश्वर महादेव महात्म्य
जगा आगळी काशी म्हणवणाऱ्या अशा या करवीर क्षेत्राला सर्व प्रकारची समृद्धी लाभलेली असून ही समृद्धी फक्त भौतिक आणि सांस्कृतिक नव्हे तर अध्यात्मिक आणि थोर विभूतींच्या आशीर्वादाची व पद्स्पर्शाची पण आहे. करवीर क्षेत्राच वर्णन करताना करवीर महात्म्यात म्हटलय कि

“करवीरे जलंशंभु पशाणस्तु जनार्दना
सिकता मुनया सर्वेतरवा: सर्वदेवता”

     

म्हणजेच करवीर क्षेत्रात जलरूपाने शंकर, पाषाणरूपाने विष्णू तर वाळूच्या कणरुपात ऋषीमुनी आणि वृक्ष रुपात सर्व देवता निवास करतात. अशा या करवीर क्षेत्री अनेक थोर विभूतीना श्री जगदम्बेच दर्शन घेतल आणि या क्षेत्री आपली आठवण म्हणून लिंगे किंवा तीर्थ स्थापन केली. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह आणि वामन हे चार अवतार वगळता इतर सर्व अवतार या करवीर क्षेत्री येऊन गेल्याची कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. पद्माळयाच्या काठावर श्री नरसिंह, कात्यायनी जवळ परशुराम आणि गोकुळ शिरगाव क्षेत्री श्रीकृष्ण अशा या अवतार परंपरेत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शानी पावन केलेले क्षेत्र म्हणजे श्री रावणेश्वर मंदिर.     राम आणि रावण यांच्यामधील नाते आपणा सर्वांनाच चांगले माहिती असताना या क्षेत्राला रावणेश्वर हे नाव कसे? असा प्रश्न आपणास पडतो, कारण आपल्या डोळ्यापुढे जो रावण उभा राहतो तो उग्र व क्रूर असा पण मुळात रावण हा पराकाटीचा शिवभक्त. त्याची दहा मुखे ही त्याच्या दशग्रंथी असण्याची साक्ष देतात, तर शिवाच्या आत्मलिंगासाठी केलेला त्याचा खटाटोप त्याच्या मातृभक्तीची आणि शिवभक्तीची साक्ष देतात. आपल्या हातानी साक्षात कैलास उचलू पाहणाऱ्या रावणाचे गर्वहरण जेंव्हा भगवान शंकरांनी केले तेंव्हा याक रावणाने आपल्या शरीराची वीणा करून भगवान शंकरांची स्तुती करून त्यांना शांत केले. व त्याच्या तांडव नृत्याच वर्णन करणार स्त्रोत्र रचून असं वरदान मिळवलं कि हे स्तोत्र जो कोणी प्रदोष काळी (सुर्यास्थानंतर अडीच तासात) म्हणेल त्याला रथ, हत्ती, घोडे अशा स्थिर संपदा व लक्ष्मी आणि सुमुख सहचारणी प्राप्त होईल. अशा या रावणाचा दुर्गुण म्हणजे त्यास असणारा अहंकार व मोह हा होय, त्या करिता साक्षात विष्णूनी रामाचा शेषाने लक्ष्मणाचा आणि लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला व नवग्रहाना सुद्धा अंकित करणाऱ्या या रावणाचा नि:पात केला.

     भगवान विष्णूच्या याच लीला प्रसंगाला जोडून करवीर महात्म्यात असा उल्लेख येतो कि प्रभू रामचंद्र वनवासात असता ते लक्ष्मण व सीता मातेसह या करवीर क्षेत्री आले व दशरथ राजाला पिंडदान करण्याची वेळ आली असता अन्य काही साधन न मिळाल्याने सीता मातेने वाळूचे पिंड तयार करून ते जवळच वाहणाऱ्या जयंती नदीत प्रवाहित केले. माता सीतेचा श्रद्धाभाव आणि करवीर क्षेत्राच्या अगाध प्रभावामुळे दशरथ राजा तृप्त होऊन मोक्षास गेला. वास्तविक पाहता पिंडदानाचा अधिकाल पुत्राचा आणि शास्त्र विधानाप्रमाने तो पिंड हा सातूच्या पिठाचा किंवा भाताचा हवा असे असताना एका स्त्रीच्या हातून वाळूच्या पिंडदानाने सासऱ्याला मोक्ष मिळणे ही गोष्ट करवीर महात्म्य स्पष्ट करणारी आहे. करवीर क्षेत्राचे हे महात्म्य जाणून प्रभू रामचंद्रांनी इथल्या एका तीर्थाच्या काठावर स्वतःच्या नावे व लक्ष्मणाने आपल्या नावे अशी दोन लिंगे स्थापन केली. सध्या रावणेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जे लिंग आहे ते रामेश्वर लिंग

तर मंदिराच्या आवारात जे बाहेर लिंग आहे ते लक्ष्मणेश्वर लिंग होय.

तर इथल्या तीर्थाला (तळ्याला) सीता तीर्थ म्हणून ओळखले जाते. काळाच्या ओघात इथे असणाऱ्या तळ्याला रावणेश्वर तळ्याकाठी असणाऱ्या रामेश्वरालाच लोक रावणेश्वर म्हणू लागले.

     आजचे कोल्हापूर हे पूर्वीच्या सहा खेड्यांनी बनलेले असून त्यातील एका खेड्याचे नाव रावणेश्वर. करवीर महात्म्यात देखील याच कारणाने याला राक्षसालय असे नाव मिळाले असावे, या खेड्याची ग्रामदेवता मुक्ताबिका तर भैरव आणि कालभैरव हे क्षेत्रपाल असून रावणेश्वर हा गावचा महादेव होता. या तळ्यातीलच अनेक भाग सीता, मारुती व प्रीजाटा यांच्या नावाने ओळखले जात. शहर सुधारणेच्या काळात हे तले मुजवून तेथे खेळाचे मैदान झाले. पण देव रामेश्वर मात्र रावणेश्वर या नावाने तसाच राहिला. आरंभी साध्या लोखंडी छत्री खाली असणाऱ्या देवालयाचा जिर्णोधार १९९४ साली झाला. आणि त्या ठिकाणी शिवलिंगाच्या आकाराचे नवे मंदिर बांधण्यात आले. सन २०१३ मध्ये याला शिखर चढवण्याचे नियोजन करण्यात आले व कर्नाटकातील कसबी कारागीरांच्या हातून एक एक शिल्पकृती साकारली गेली त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ.

     मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावरती आपणास श्रीशिवशंकराची ध्यानस्थ मूर्ती पहावयास मिळते,

नांदी व मोर यांच्या शिल्पांनी अलंकृत अशा या प्रवेशद्वारातून आत येतानाच मंदिराच्या संरक्षक भिंतीवरती आपणास बारा ज्योतिर्लिंगाची उठाव शिल्पे पहावयास मिळतात.

ही शिल्पे पहात येतानाच दोन स्तंभांवरती शृंगी आणि भृंगी हे दोन शिवगण दिसतात विशेष म्हणजे हे त्रिपाद (३ पायांचे) असून यातील कुठलाही एक पाय झाकला असता उरलेल्या दोन नृत्यमुद्रा दिसते, यातील शृंगीच्या हातात कर ताल तर भृंगीच्या हातात विना आहे. या शिवगणांचे दर्शन घेत आपण मंदिराच्या मुख्य दाराजवळ येतो. तीर्थ दाराच्या दोन बाजूला काचेमध्ये आपणास उजवीकडे विर्भाद्राचे तर डावीकडे भैरवाचे चित्र दिसते. यातील वीरभद्र म्हणजे भगवान शंकराच्या तमोगुणाचा अंश, सती दाक्षाय हिने प्रजापतीच्या यज्ञासमोर स्वतःचा देह नष्ट करून घेतला तेंव्हा तो यज्ञ मोडण्यासाठी महादेवानी विर्भाद्राला प्रकट केले तेंव्हा त्याने दक्ष प्रजापतीचे मस्तक उडविले व नंतर महादेवानी बकऱ्याचे मस्तक जोडून त्यास जिवंत केले.

     भैरव हा देखील भगवान शंकरांचाच ब्रम्हदेवाच्या गर्वहरणाने प्रकटलेला अंश असून हा भैरव क्षेत्रपाल म्हणून काम करतो. या ६४ भैरवांचा प्रतिनिधी रु असा एक भैरव इथे चित्रित केला आहे. तिथून पुढे येताच आपली नजर जाते ती कोपऱ्यात असणाऱ्या गंगा व गौरी यांच्या मूर्तीकडे. उजव्या बाजूस कमळात बसलेली आणि मगरीचे वाहन असणारी देवी गंगा वरील दोन हातात कमळ, कलश धारण करून खालील दोन हातांनी वरद अभय देत आहे.

डावीकडे देवी गौरी उजव्या हाता वरद वर त्रिशूल, डावीकडे आरसा आणि कुंकवाचा करंडा धारण करून विराजमान झाली आहे.

शंकराच्या वामा आणि दक्षिणा अशा या दोन शक्तीची ही शिल्पे क्वचितच इतरत्र पहावयास मिळतात. त्यांच्या समोर प्रतीकात्मक जलकुंड असून तो पूर्वीच्या रावणेश्वर तीर्थाची आठवण करून देतो.

     लगतच्या भिंतीवर भगवान रावणेश्वरांकडे मुख करून नमस्कार केलेली त्रिजटा पहावयास मिळते. सीतामाई अशोक वनात असता तिने प्राणपणाने त्यांचे रक्षण केले म्हणून प्रभू रामचंद्रांनी तिला वरदान दिले कि कार्तिक महिन्याचे कार्तिक स्नान साम्प्लेव्र देखील लोक ३ दिवस जास्त तुझे नावाने स्नान करतील अशा या त्रिजटेचे अपवादात्मक तीर्थ या करविरी होते त्याची आठवण म्हणून हे शिल्प स्थापन केले आहे.

     त्रिजटे पुढे नंदी व त्यापुढे गर्भागाराच्या उजवीकडे श्री मारुती तर डावीकडे श्री गजानन विराजमान असून गाभाऱ्यात श्री रावणेश्वर महाराज पूर्वाभिमुख असून शिवलिंगाची नाळ उत्तरेला आहे. दक्षिणेच्या रामेश्वराप्रमाणेच चौकोनी पिठाकेत देवाचे लिंग आहे. लक्ष्मीविजयातील उल्लेखाप्रमाणे करवीर क्षेत्री बारा ज्योतिर्लिंगाची जी स्थान आहेत त्यामध्ये देव रामेश्वराचे स्थान म्हणजे हे देवालय होय.

     श्रींचे दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर पडताच वर मोठ्या आकारात महाराष्ट्राची शक्ती परंपरा समृद्ध करणाऱ्या महालक्ष्मी तुळजाभवानी, रेणुकामाता व सप्तशृंगी या साडेतीन शक्तीपीठ देवतांच्या प्रतिमा त्यांच्या स्तुती मंत्रासाहितआहेत.

त्यांच्या डाव्या बाजूस सीतामाई वाळूचे पिंड तयार करीत असून त्यांना राम, लक्ष्मण व हनुमान सहाय्य करीत असलेले उठावदार शिल्प दिसते हे पाहत आपण लक्ष्मण लिंगाकडे येतो.

     माता पार्वतीच्या जन्ममृत्युच्या रहस्याची कथा सांगणारे शिवरूप अमरनाथ म्हणून ओळखले जाते, त्या अमरनाथ गुफांची व हिमलिंगाची प्रतिकृती व तेथेच देव लक्ष्मणनेश्वर आणि श्री गणेशाचे आपणास दर्शन होते.     या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे शिवनिर्माल्य कोठेही ओलांडले जात नाही मात्र येथे श्रीलिंगाजवळ चंडेश गणाची स्थापना केल्याने निर्माल्य दोष नाहीसा झालेला असून त्यामुळे मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घालता येते.

     या मंदिराचे सर्वात अधिक लक्ष वेधणारे वैशिष्ट म्हणजे याचे शिखर, या शिखच्या पूर्वेस भगवान महादेव गौरी, गणपती, स्कंद (कार्तिक) यांच्या समवेत सहपरिवार कुटुंब वात्सल्यरुपात आहेत.

उत्तरेस पंचानन म्हणजेच पाच मुखे असणारी महादेवाची मूर्ती असून सद्योजात, अघोर, ईशान, वामदेव व तत्पुरुष अशी जगाला ज्ञान देणारी जल, अग्नी, वायू, पृथ्वी व आकाश या तत्वांची प्रतिनिधित्व करणारी ही मुखे असून महादेवाच्या या रुपालाच सदाशिव असे म्हणतात. पश्चिम दिशेला भगवान महादेव नटेश्वर रुपात आपले दर्शन देतात. सृजन, पालन व संहार या तिन्ही स्थितीवरील स्वतःचे नियंत्रण यात दिसते, या सर्वासोबत सगळ्यात महत्वाचे शिल्प दक्षिणेस आहे आणि ते म्हणजे शिवआराधना करणारा रावण. या आणि अशा अनेक शिल्पवैभवानी समृद्ध असणारे असे हे श्रीरावणेश्वर मंदिर हरी आणि हर या दोन्ही देवतांच्या भक्तांना प्रिय होईल यात शंकाच नाही.

माहिती व संदर्भ संकलक व मंदिर अभ्यासक
श्री. उमाकांत राणिंगा
श्री. प्रसन्न मालेकर
मंदिराची वेळ

१. मंदिर खुले होणेची वेळ सकाळी ६.०० वा.
२. मंदिर पुजेस सुरुवात सकाळी ७.०० वा.
३. सकाळची आरती सकाळी ८.३० वा.
४. सायंकाळ आरती सायं. ७.३० वा.
५. ॐ नम: शिवाय जप सायंकाळी ७.४५ ते ८.००
६. सकाळी १२.०० वा. पर्यंत गर्भद्वार खुले राहील.
७. सायंकाळी ४.०० नंतर गर्भद्वार बंद होईल
८. रात्री ९.०० वा नैवद्यनंतर गर्भद्वार बंद होईल.
९. रात्री १०.०० वा. मंदिर मुख्यद्वार बंद होईल
१०. दर सोमवारी सकाळी ७.०० वा. रुद्राभिषेक होईल.

पुजा संपर्क
१) लघुरुद्राभिषेक -
४०००/- रुपये
२) रुद्र एकाद्शनी अभिषेक -
१५००/- रुपये
३) रुद्राभिषेक -
३५१/- रुपये
४) सहस्त्र बिल्व – पत्र अर्चन पूजा -
१००१/- रुपये
५) दहीभात पूजा -
४०१/- रुपये
६) पंचामृत अभिषेक -
१०१/- रुपये
७) सामुदायिक अभिषेक -
५१/- रुपये
श्री रावणेश्वर आरती

Copyright © 2016 Shri Ravneshwar Mahadev Temple, Kolhapur All Rights Reserved. Developed By : Global Eye Technology